Blog

शासकतेची २० वर्षे !

Accessibility

Date: 07/10/2020जे. पी. नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ या तारखेस पहिल्यांदा घेतली, म्हणजे राज्य वा केंद्र पातळीवर ‘सरकारप्रमुख’ म्हणून मोदी हे आज विसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. द्रष्टेपणा, आत्मसंयम, परिश्रम या गुणांमुळे मोदी पुढेही कार्यरत राहणारच आहेत आणि ‘आत्मनिर्भर भारता’ची निर्मिती करू शकणार आहेत..

७ ऑक्टोबर ही एरवी निरुपद्रवी तारीख, २००१ सालात भारताच्या राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरली. याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री या पदाची शपथ पहिल्यांदा घेतली. तेव्हापासून आजतागायत, सरकारप्रमुख या नात्याने त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव न पाहता, पंतप्रधानपदाच्या राष्ट्रीय जबाबदारीची भूमिका स्वीकारली आहे. याचा अर्थ असा की, राज्य अथवा केंद्रातील ‘सरकारप्रमुख’ पदाच्या विसाव्या वर्षांत आज- ७ ऑक्टोबर २०२० या दिवशी- नरेंद्र मोदी प्रवेश करीत आहेत. लोकांचा विश्वास एकदाच नव्हे तर वारंवार, सलग जिंकत राहणे- तेही अधिकाधिक प्रमाणात- ही जी क्षमता त्यांच्याकडे आहे, त्याविषयी हा दिवस आपणांस बरेच काही सांगणारा ठरतो.

अर्थात होते असे की, निवडणुकांतील विजय आणि गडगंज लोकप्रियता हे जे परिणाम आहेत, त्यांच्याचकडे साऱ्यांचे आधी लक्ष जाते. प्रत्यक्षात या विजयांमागे अथक परिश्रम व अद्वितीय द्रष्टेपण आहे, म्हणूनच नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासूनच मोदी इतरांपेक्षा निराळे असल्याचे दिसून येऊ लागले. ‘वीज क्षेत्रात सुधारणा करणे म्हणजे राजकीय आत्महत्याच,’ असे मानले जात असतानाच्या काळात मोदी यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले, गुजरातमधील वीज क्षेत्र सुधारले, प्रत्येक गुजराती खेडय़ापर्यंत वीज नेली आणि गुजरातला वीज-आधिक्याचे राज्य बनविले.

गुंतवणूकदारांचे मेळावे जेव्हा राष्ट्रीय स्तरावरही दुर्मीळच होते, त्या वेळी- २००३ मध्ये मोदी यांनी ‘व्हायब्रंट गुजरात (रंगीलो गुजरात) इन्व्हेस्टर समिट’ सुरू केला. तेव्हापासून या मेळाव्यानेच नव्हे तर गुजरात राज्यानेही जगभरच्या गुंतवणूकदारांमध्ये स्वत:ची ओळख मिळवलेली आहे. याचप्रमाणे, पंतप्रधान म्हणूनही मोदींनीच उच्चांकी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) भारतात आणवली आहे.

‘गुजरात मॉडेल’ची ओळख सर्वाना आहेच. हा अर्धाअधिक प्रदेश कोरडवाहू असूनही कृषी क्षेत्रात प्रचंड वाढ गुजरातने पाहिली, तसेच गुजरातमधील पायाभूत सुविधाही वेगाने वाढल्या. आता कित्येक दशकांनंतर शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य सुनिश्चित करणारे पाऊल पंतप्रधान या नात्याने मोदींनी उचलले आहे आणि देशातील पायाभूत सुविधांची वाढ मोदी यांच्या नेतृत्वाखाली आधीही जितकी प्रचंड झाली, त्याहीपेक्षा अधिक होणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी मुली (स्त्री भ्रूण) वाचवण्यावर तसेच मुलींच्या शिक्षणावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’द्वारे जो भर दिला त्याची व्यापक प्रशंसा होत असतेच. मुळात हा गुजरातच्या ‘कन्या केळवणी’ उपक्रमाचा तर्कसंगत विस्तार आहे आणि गुजरातमधील मुलींच्या शिक्षणासाठी आखलेल्या त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी तर, अख्खे सरकार- अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली- खेडय़ापाडय़ांत तळ ठोकून, मुलींची पटनोंदणी वाढण्यासाठी प्रोत्साहन देऊन करीत असे.

मोदी हे लोकनियुक्त नेते म्हणून दीर्घायुषी ठरण्याचे कारण म्हणजे स्वत:लाच आव्हान देण्याची त्यांची क्षमता.. सातत्याने आणि कोणा प्रतिस्पध्र्याला प्रयत्नही करता येणार नाहीत इतक्या आक्रमकपणे मोदी स्वत:ला आव्हाने देत असतात. जाहीरपणे आणि धाडसीपणे लक्ष्य ठरवण्याची जोखीम ते घेतात. ‘धोरणलकव्या’ने ग्रस्त अशा प्रशासनाचा वारसा स्वीकारावा लागूनसुद्धा मोदी यांनी त्यांच्या प्रत्येक प्रमुख योजनांसाठी विशिष्ट लक्ष्ये ठरवून दिली- मग ती योजना स्वच्छ भारत असो की ग्रामीण वीजजोडण्याची असो की सर्वासाठी घर देणारी, सर्वाना पिण्यायोग्य पाणी देणारी असो की शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याची असो.

गुजरातच्या आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील त्यांची शासकता ही कार्यक्षम आहे, परिणामकारक आहे आणि सुधारणावादीसुद्धा आहे. मात्र या शासकतेबद्दल कितीही बोलावे, बोलतच राहावे आणि थांबूच नये अशी स्थिती असली तरीही, २००१ मधील गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीचे साजरेपण हे आणखी निराळ्याच कारणामुळे आहे.

नरेंद्र मोदी हे शासकता आणि राजकारण यांच्या पापुद्रय़ांच्या पलीकडे असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. भारत आणि भारतीय यांमधील जे जे उत्तम, त्याला आवाहन करतात आणि उत्कृष्ट परिणामदेखील मिळवून दाखवतात.

मोदी यांनी लोकांना त्यांच्यातील उत्तम गुण पुढे आणण्याची चेतना दिल्यामुळेच स्वच्छता ही लोकचळवळ झाली. ज्या देशात जास्त जास्त ‘सबसिडी’ (अनुदाने) देणे हीच राजकीय संस्कृती होती, तेथे नरेंद्र मोदी यांनी लोकांना गॅस सिलिंडरवरील अनुदान-त्यागाची, सबसिडी ‘गिव्ह अप’ करण्याची प्रेरणा दिली.

भारतीय सभ्यता ही वैविध्यपूर्ण आणि सहिष्णू असून अस्मितांच्या पलीकडे कसे जावे हे माहीत असणे, ही तिची उत्कृष्टता ठरली आहे. नरेंद्र मोदी हे एक गुजराती; पण जेथून ते विजयी झाले तो लोकसभा मतदारसंघ उत्तर प्रदेशातील, तो विजयही कोणत्याही एका जातीला, समाजाला, वर्गाला किंवा प्रांतीय भावनांना पक्षपाती आवाहन न करता! मोदी यांचे आवाहन हे या विभागण्या ओलांडणारे व राष्ट्रभरातील लोकांना एकसंध करणारेच आहे, त्यामागील उद्देश केवळ एकच- भारताची महानता!

तिरस्कार आणि निंदा कितीही झाली, तरीदेखील आत्मसंयमी प्रतिष्ठा राखणे, ही भारताच्या सर्वोत्कृष्ट परंपरेची शिकवण. ती हेही शिकवते की, अशा शांत, पोलादी आणि प्रतिष्ठित कृतनिश्चयाला जेव्हा साक्षात सत्याचे पाठबळ असते, तेव्हा साऱ्या नकारात्मकतांवर अंतिमत: मात केली जाते. नरेंद्र मोदी यांच्या उदयाची कहाणीदेखील अगदी अशीच आहे. एका अख्ख्या परिसर्गाने त्यांना हेरले आणि गेली दोन दशके मोदी यांच्या कीर्तीला डागाळण्याचा प्रयत्न अनेकांनी चालवला. एखादा लहानसा अविवेकदेखील मोदी यांच्या राजकीय प्रवासाचा अंत ठरू शकला असता, अशी ही – बहुतेकदा अन्यायकारकच- उलटतपासणी असूनसुद्धा मोदी आधी आपल्या राज्यात आणि पुढे राष्ट्रासाठी आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करीत राहिले. मोदी यांची संयमी शांतता आणि दृढनिश्चय यामुळे त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.

बऱ्याचदा दिसते की काही लोक ‘बिग पिक्चर’वाले असतात, मोठे असतात, तेही द्रष्टे असतात, पण हे द्रष्टेपण प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या अथक कृतीची गरज असते तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत. शिवाय काही जण असे असतात की दिलेली लक्ष्ये ते पूर्ण करून दाखवतील, पण व्यापक चित्र समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. मोदी यांच्याकडे मात्र या दोन्ही क्षमता अंगभूत आहेत. ते द्रष्टे नेते आहेतच आणि कामाला वाघ आहेत. अधिक मोठे द्रष्टेपण दाखवण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्या द्रष्टय़ा ध्येयांच्या पूर्तीसाठी कोरडेपणाने, काटेकोरपणे आणि न थकता जी एकेका पायरीची आखणी करावी लागते, तीसुद्धा ते करू शकतात.

सरकारप्रमुख म्हणून नरेंद्र मोदी हे विसाव्या वर्षांत पदार्पण करीत असताना, गतकाळातील त्यांच्या उपलब्धी या थक्क करणाऱ्या आहेतच, परंतु आणखी उत्कृष्ट असे काम त्यांच्याकडून पुढेही होणार आहे आणि ते म्हणजे आत्मनिर्भर भारताची निर्मिती!

Back to Top